मुंबई : नोकरीतील महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतांना येणाऱ्या अडचणी या महाराष्ट्रातील महिला कर्मचाऱ्यांचा मुख्य प्रश्न आहे. महाराष्ट्रातील महिला अभियंतांच्या अडचणी जाणून घरण्याकरिता ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्रीमती शाहीन अन्सारी (प्रतिष्ठित वक्ते, कोल्हापूर) मा.श्रीमती सुनंदा जगताप (अधीक्षक अभियंता पुणे, जलसंपदा विभाग) मा.श्रीमती वैशाली नारकर (अधीक्षक अभियंता रत्नागिरी, जलसंपदा विभाग) व इतर अधिकारी व बहुसंख्य अभियंता महिला चर्चेत सामील होते. या ऑनलाइन चर्चासत्र चे सूत्रसंचलन श्रीमती गंगाजल पाटील ( महिला सचिव, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य) यांनी केले.
पुरुषांमध्ये स्त्री विषयी आदरभावना वाढविणे फार आवश्यक आहे तसेच महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत ऑनलाइन चर्चासत्रसाठी आलेल्या प्रमुख पाहुण्या मा. श्रीमती शाहीन अन्सारी (प्रतिष्ठित वक्ते, कोल्हापूर) यांनी प्रतिपादन केले. या चर्चासत्रात मा.श्रीमती सुनिता पाटील , (कार्यकारी अभियंता उस्मानाबाद, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद) यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.चर्चासत्राची सुरूवात विशाखा समितीचं नेमकं काय काम असतं? लैंगिक अत्याचार, सावधानता, प्रतिकार, सुरक्षा, याबाबत मा.श्रीमती स्नेहा देव (यशदा लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समिती सदस्य) यांनी माहिती दिली. शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या अडीअडचणी बाबत कार्यालयात काम करत असताना वरिष्ठ अधिकारी व पुरुषांकडून होणार्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली तसेच शासकीय सेवेतील महिलांना असलेले अधिकार कायदेशीर बाबी, लैंगिक अत्याचार याबाबत मा.श्रीमती रसिका निकुंभ (विशेष सहाय्यक सरकारी वकील) यांनी कायद्याचे ज्ञान दिले.
महिलांचे आरोग्यमान, महिलांचे नियमित आरोग्य तपासणी आणि सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत महिलांनी स्वतःची तब्येत आणि प्रतिकार शक्ती वाढविणे याबाबत मा. श्रीमती तारुलाता धाणके मॅडम (तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती शहापूर)यांनी सखोल चर्चा केली. कार्यालयीन कामकाजात काही अडचणी असल्यास महिलांनी एकमेकांना समजून घेत सहकार्याची भावना जपावी याबाबत मा.श्रीमती वैशाली परुळेकर(परिविक्षा अधिकारी,महिला व बालविकास विभाग) यांनी चर्चासत्रात सहभागी होवून मार्गदर्शन केले.पुढील काळामध्ये महाराष्ट्र शासकीय महिला कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्याबाबत निश्चित झाले आहे.महिलांच्या अडी-अडचणी बद्दल संदेश फलक ज्याप्रमाणे लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे फलक प्रत्येक कार्यालयांमध्ये असतात त्याप्रमाणे महिलांचे अडचणीचे फलक प्रत्येक कार्यालयामध्ये लावण्याचे मानस आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागणी करण्याचे नियोजन आहे. दिल्ली सरकारने महिलांसाठी मुफ्त बस सेवा चालू केली आहे त्याच धरतीवर सरकारी महिला शासकीय कर्मचारी यांचेसाठी वेगळी बस सेवा चालू करावी. तसेच सर्व महिला स्तरावरील महिला कर्मचारी यांना अडचणी आल्यास सोडविण्याचे आश्वासन चर्चासत्रात उपस्थित वरिष्ठ महिला अधिकारी यांनी दिले आणि सहा महिन्यात एकदा अशीच चर्चासत्र घेण्याचे ठरविले आहे.