राम मंदिराच्या उभारणीत मोदींचे कोणतेही योगदान नाही – सुब्रमण्यम स्वामी

14

नेहमीच वेगळी भुमीका घेणारे भाजपा नेते सुब्रमाण्यम स्वामी यांनी राम मंदिरासंबंधी महत्वपूर्ण विधान केलं आहे. राम मंदिर उभारणीत मोदींचे कोणतेही योगदान नसल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. आता काम सुरू झालेलं असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी हे विधान केलं आहे. “पंतप्रधानांचं यामध्ये कोणतंही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळे म्हणू शकतो की, निर्णय आला. मूळात ज्यांनी यात काम केलं आहे, त्यांचं मी नावं घेतलं आहे. यात पहिलं नावं राजीव गांधी यांचं आहे,” असं स्वामी म्हणाले.