भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या बातम्या माध्यमांमधून चर्चिल्या जात आहेत. मात्र अजूनही खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यावर एकनाथ खडसे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” अशी प्रतिक्रिया देत आळीमिळी गुपचिळी कायम ठेवली. तर, “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असा टोला देखील त्यांनी लगावला.
गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी भाजप आणि स्वकियांवर टीका केली आहे. त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करावा अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ते घटस्थापनेच्य मुहूर्तावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र अजूनही त्यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला नेमकी अडचण काय आहे. हे येणाऱ्या काळात कळणार आहे.