राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून धक्काबुक्की व अटक

17

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण असून, कलम 144 लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पीडितेच्या घरी भेट देण्यासाठी हाथरस गाठले. त्यामुळे तिथे प्रचंड गदारोळ माजला असून कार्यकर्ते व पोलीस यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शांतता राखण्यासाठी राहुल गांधी यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यावर ठाम असून ते पायीच पीडितेच्या घराकडे निघाले. त्यावेळी त्यांची अडवणूक करत यूपी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. तसेच ते माघार घेत नसल्यानं त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केलंय.