मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारांना मार्गदर्शन करतांना भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत, असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली होती. मात्र, कमलनाथ यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, तो एक सामान्य शब्द आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका मराठी माध्यमाच्या वेबसाईटला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणतात की, कमलनाथ जी ‘आइटम’ हा शब्द सर्रास वापरला जात असेल लोकसभेत आणि विधानसभेतसुद्धा परंतु तो एखादी वस्तू म्हणून वापरला जातो.. इथे आपण ज्यांचा उल्लेख आइटम असा केलात ती समाजातील प्रतिष्ठित महिला आहे आणि महिलेला आइटम म्हणणे म्हणजे नक्कीच अपमानास्पद आहे.आणि हो यावरून महिलांविषयीची तुमची मानसिकता सुद्धा आज सर्वांना दिसून आली. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याला महत्त्व नाही परंतु तुमचे महिलांसंदर्भात काय विचार आहेत हे महत्त्वाचे आहेत. तुमच्यासारखे माजी मुख्यमंत्री म्हणजेच जबाबदार लोकप्रतिनिधी जर महिलांना आईटम हा शब्द जाहीरपणे बोलत असतील तर या देशातील महिला अत्याचाराचे प्रकार कधी कमी होतील असे वाटत नाही, कारण तुमच्यासारखे जबाबदार लोकप्रतिनिधींचा आदर्श इतर लोक घेत असतात, तुम्ही समस्त महिलावर्गाची माफी मागा अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली आहे.