“वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता” हाथरसची पण निर्भयाच का ?

53

फाशी झालीच पाहिजे.! नराधमांना चौकात गोळ्या घालून encounter करून टाका ! त्यांची गाडी पलटी करा! सत्तेत असणाऱ्या सरकारनं राजीनामा द्या! (सरकार कोणतही असो बहुदा विरोधी पक्ष आणि जनता हीच मागणी करतात.) हे असलं कृत्य करून महिलांवरील वाढते अत्याचार थांबणार आहेत का? अत्याचार करणाऱ्या नराधमांना आळा बसणार आहे का?

परवा दिल्ली, कथुवा, हैद्राबाद, कोपर्डी, खैरलांजी आणि आज हाथरसने पूर्ण मानवी समाज हेलावून टाकलाय. यामुळे मानवी समाज आणि एकूण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. याला जातीच लेबल लावून पाहणं योग्य राहणार नाही कारण गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराला जात नसती. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. अशा घटना का घडतात या मागची कारण काय आहेत ? एका एकोणीस वर्षीय मुलीला पुरुषी शक्तीच्या जोरावर अमानवी प्रवृत्तीने मारलं जातं. तिची जीभ कापली जाते. तिचा मनका तोडला जातो. नको नको ते तिच्या सोबत केलं जातं! रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार कुटुंबाच्या परवानगीशिवाय मानवी हक्कावर गदा आणून उरकला जातो. तिचा आईबापाला चेहरा सुद्धा पाहू दिला जात नाही.

अशा निरपराध कित्येक कळ्या काळ्याकुट्ट सैतानी अंधारात चिरडल्या जातात. काही घटना पोलीस ठाण्यापर्यंत, पंचायती पर्यंत, न्यायालया पर्यंत जातात हे आपण NCRB च्या अहवालातून पाहिलं आहे. रोज देशात 87 बलात्कार होतात. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये यात 7% वाढ झाली आहे. हे झालं सरकारी पातळीवर पण असे कित्येक प्रकरणं आहेत जी कागदावर उमटत ही नाहीत. सरकारी यंत्रने पर्यंत जात सुद्धा नाहीत. याचा हिशोब लावणं अवघड आहे.

सरकारी यंत्रणा आश्वासनाची मलमपट्टी लावून मोकळी होते. प्रकरणं कोर्टात वर्षानुवर्षे चालत राहतात. निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि ही भयानक परिस्थिती पाहता संसदेने या संदर्भात कडक कायदा संमत केला तरी ही निर्भयाला न्याय मिळण्यासाठी आठ वर्ष संघर्ष करावा लागला. आणि चारी आरोपी फासावर लटकवून न्याय मिळाला. मग आपण या ही घटनेला निर्भया म्हणून फरफटत बसणार आहोत का?  हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

अशा घटना घडल्या की याला राजकीय पक्ष जातीय रंग देतात मग राजकीय पक्ष राजकारण करत आंदोलनाच आयोजन करतात सत्ताधारी पक्षाला राजीनामा मागतात ते ही केलंच पाहिजे!लोकशाहीत असा अधिकार आहे. प्रसारमाध्यमांना debate साठी मुद्दा सापडतो मग चालू होतं तुमचं सरकार असताना होत नव्हते का असे अत्याचार ? अमुक राज्यात तुमचं सरकार आहे तिथं सगळ्यात जास्त अत्याचार होतात. तमुक राज्यात आमचं सरकार आहे इथं कमी अत्याचार होतात. मग सामान्य माणूस याच्यावर विचार करतो अन् कुठंतरी तटस्थ भूमिका घेतो.असा मुद्दा आला की महिना -दीड महिना चालतो आणि परत जैसे थे परिस्थिती निर्माण होते. असं का व्हावं? आपण माणूस म्हणून कधी विचार केलाय का? अशा आपल्या समाजात घटनाच घडू नये म्हणून आपण कधी उपाय केलेत का? मग ते आपण करणार आहोत की नाही? अशा प्रकारे अनेक प्रश्न संवेदनशील माणूस म्हणून आपल्या मनात येणं साहजिकच आहे.परंतु ते का येत नाहीत?
       
हाथरस ची घटना ही भयानक आहेच पण यासारख्या कित्येक घटना आपल्या समाजात घडतात हे आपण जाणतोच. तरीही आपण आपल्या संवेदनशीलतेला गमावून बसलो आहे का?स्री ला लक्ष्य करण्याची विषारी मानसिकता समूळ नष्ट करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. स्रीविषयी आदर भावना आणि समानतेचे धडे गिरवून प्रत्यक्षात उतरवणे आजच्या काळात फार गरजेचं आहे.याशिवाय या अशा किती ही कठोर कायदा असला तरी निर्दयी घटना थांबणे कठीण आहे.

गणेश अरुण मोरे
मोहोळ जि.सोलापूर