सामान्यांना संकट काळात हमखास आठवणारा पोलिसांचा नंबर म्हणजे शंभर. आता हाच एक शून्य शून्य म्हणजेच शंभर नंबर बंद होणार आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्रीय स्तरावर एकच हेल्पलाईन क्रमांक असावा अशी मागणी झाली होती. त्यावर सर्वोच्च न्यायलायाच्या आदेशाने आपत्कालीन प्रतिसाद सहाय्यक प्रणालीची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे राज्यातील सर्व भागाचे जिओ टॅकिंग केले जात आहे. त्याचबरोबर सेंट्रलाइज कंट्रोल रूमला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आले आहे. सेंट्रलाइज कंट्रोल रूम मध्ये एकाच वेळी किमान ७० ते ८० प्रशिक्षित लोक काम करणार आहेत त्यामुळे नागरिकांना कमीत कमी वेळात सर्व प्रकारची मदत पोहोचवली जाईल या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर राज्यातील १०० हा क्रमांक बंद केला जाणार आहे.
गेल्यावर्षी उत्तर प्रदेश सरकारने १०० नंबर बंद करून नवीन ११२ ही हेल्पलाईन स्वीकारली होती. आता महाराष्ट्रात सुद्धा ११२ ह्या हेल्पलाईन नंबरचा स्वीकार केला जाणार आहे. एकाच वेळी सर्व प्रकारची मदत सामान्यांना मिळावी यासाठी केंद्र पातळीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात ११२ ही हेल्पलाइन सुरू व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ११२ क्रमांक सुरू झाल्यावर पुढील काही दिवसांसाठी १०० क्रमांक देखील सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती, अप्पर पोलीस महासंचालक प्रधान मॉडेल ऑफिस ऑफिसर सेंट्रलाइज हेल्पलाइन सिस्टीम एस. जगन्नाथन यांनी दिली आहे.