भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काल मुंबईत दाखल झाले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमातून चर्चिल्या जात होत्या. त्यातच ते आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे
नाराज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे तर्क वितर्क लावले जात असून, येत्या काही दिवसात ते भाजपला सोडचिट्ठी देतील आणि राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
एकनाथ खडसे यांना ठरवून राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी केले आहेत. भाजप नेत्यांवर त्यांनी अनेक आरोपही केले होते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये अनेकवेळा व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत. त्यातच ते शरद पवारांना भेटणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.