सुकलेलं पान , वाळलेलं झाडं, आटलेली विहीर, ओसाड रान अन् अफाट ऊन…
अहो कुठल्या जन्माचं म्हणायचं हे ऋण..!
स्वतःला राजा म्हणवणारा माझा शेतकरी राजा आज जगून मारतोय,
नशिबी आलेलं कर्म आज भोगून घेतोय,
व्यापारी मात्र त्याच्या जीवावर तिजोरी भरतोय.
अर्ध्या भाकरीवर शेतकऱ्याचा बाप मात्र जगतोय,
शेतात कामं करुन मुलगा कसं तरी शिक्षण करतोय,
जमीन गहाण ठेऊन मुलीच्या लग्नाचा थाट रचतोय,
बायकोचे दागिने मोडावे लागले म्हणून आतल्या आत खचतोय.
कशीतरी चूल चालवी म्हणून गाई-गुर जपतोय,
सावकाराची देणी देत देत सार आयुष्य मात्र सरतय,
अन् बँकेच्या कर्जाचा डोंगर मात्र वाढतोय,
काही क्षण तर स्वताःच जीवन संपवाव असं वाटतय,
पण मागे काय होईल याची चिंता मनात घर करुन बसतेय,
मेलो तर काय ? चार नेते येऊन जातील दारावर,
देतील फुटकळ आश्वसनं अन् जनतेच मत घेतील हिरावून.
झुरत-झुरत जीवन मात्र शेतकरी जगतोय,
अन् मॉल मधे हजारो रूपये खर्च करणारा माणुस दहा रुपयांची भाजी त्याला पाच रुपयाला मागतोय..!
भर उन्हात पावसाची वाट बघतोय,
कधी आलाच पाऊस तर स्वतःला नांगरला जंपुन पेरणी करतोय.
राब राब कष्ट करून पीक माझा शेतकरी राजा पीकवतोय,
पण त्याला भाव मात्रं कोण्या हक्काचा व्यापारी ठरवतोय.
शेतकरी जगण्यासाठी धडपड करतोय,
सरकार मात्र उंटावर बसून शेळ्या हाकतयं…!
खरचं का? या कृषिप्रधान देशात शेतकरी राजा भिकारी ठरतोय…!
- – रेवती रामदास डोके,बीड