सरकार कोणतही असो शेतकरी नेहमीच हालखीच जीणं जगत असतो. सरकारे येतात आणि जातात मात्र शेतकऱ्याच्या जगण्यात फारसा फरक पडत नाही. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी नेहमीच कर्जमाफीचा जालीम उपाय शोधला जातो. मात्र या उपायाने ना शेतकरी कर्जमुक्त होतो ना त्याच्या परिस्थितीत बदल होतो. तो नेहमीच खंगलेल्या अवस्थेत असतो. आपली दु:ख व्यक्त तरी कशी करायची यासाठी मग उदीग्न होऊन काहीतरी हटके प्रकार केला जातो. असाच एक प्रकार केलाय बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने.
सग्रामपुर तालुक्यातील शेतकरी नीलकंठ लिपते यांनी चक्क आपल्या शेतातच फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सवर लिहलेल्या मजकुरातून फडणवीस आणि ठाकरे या दोन्ही सरकारचे वाभाडे काढण्याचे काम नीलकंठ लिपते या शेतकऱ्याने केले आहे. लिपते यांची दोन एकर शेती असून त्यावर त्यांनी २०११ मध्ये दीड लाख रूपये कर्ज काढले होते. फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर लिपते यांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केला मात्र त्यांची कर्जमाफी काही झालीच नाही. यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनेही काही अटी घालून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. लिपते यांनी पुन्हा कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केला. मात्र दोन्हीवेळी त्यांची दिशाभुलच झाली. यामुळे उदीग्न झालेल्या लिपते यांनी आपल्या शेतातच फ्लेक्स लावून त्यांची व्यथा जगापुढे मांडली आहे.
लिपते यांनी केलेल्या या अनोख्या प्रकारामुळे माध्यमांना तर त्यांची दखल घ्यावी लागलीच. याबरोबरच आसपासच्या परिसरातही त्यांची चर्चा होत आहे.