ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्याने तुरुंगातून बाहेर पडलेल्या रिया चक्रवर्तीने शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानी या महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. चक्रवर्तीने सीबीआयकडे आपले तक्रार पत्र सोपवले आहे. खोटी माहिती देऊन, सीबीआयच्या तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न डिंपलने केला, असा आरोप रिया चक्रवर्तीने केला आहे. रितेश देशमुखने रीयाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबधित ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्याने तुरुंगाबाहेर आलेल्या रियाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच अभिनेता रितेश देशमुखने रियाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. ‘रिया चक्रवर्ती तुला लढण्यासाठी खूप ताकद मिळो. सत्यापेक्षा ताकदवान कोणीच नाही’, अशा आशयाचे ट्विट रितेश देशमुखने केले आहे.