‘सरकार चालवणे येड्यागबाळ्याचे काम नाही’, या दानवेंच्या विधानावर राऊतांचा पलटवार म्हणाले…

20

राज्य करणे येड्यागबाळ्याचे काम नाही असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून दानवेंच्या या विधानावर टीका करण्यात आली आहे.

देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. आर्थिक मंदीची लाट सरकार रोखू शकत नाही. कारण उद्योग, व्यापार क्षेत्रात आजही निराशा, भयाचे वातावरण आहे. हिंदुस्थानचा जीडीपी बांगलादेशपेक्षा कमी झाला हा धक्का आहे. म्हणजे आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरत आहे. कोरोना वगैरे कारणे काहीही असतील. मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत? याचे उत्तर भाजपचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. राज्य करणे हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे! देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

हिंदुस्थानात ही स्थिती आली कारण सुमार दर्जाची अंमलबजावणी प्रक्रिया, प्रभावी देखरेखीचा अभाव, कुपोषणाची समस्या हाताळण्यातील उदासीन दृष्टिकोन आणि मोठय़ा राज्यांची असमाधानकारक कामगिरी ही प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे जागतिक तज्ञांनी म्हटले आहे. हा सरळ केंद्राच्या अकार्यक्षमतेवर ठपका आहे. राज्य चालविणे म्हणजे विद्वेष पसरविणे नव्हे. कुणी भूक, बेरोजगारीवर प्रश्न उपस्थित करीत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी हिंदू-मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तानसारख्या मुद्दय़ांचे मृदंग थापडवायचे. नोटाबंदी, जीएसटीने देशाची आर्थिक ताकद कमजोर केली. लोकांनी रोजगार गमावला, पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेल वगैरे विषय बाजारात आणून चर्चा घडविणे हेच देशातील वाढत्या भूक अराजकाचे लक्षण आहे, असं शिवसेनेनं आपल्या अग्रलेखात म्हटले आहे.