“सुख म्हणजे नक्की काय असतं”

30

माणूस म्हणून प्रत्येक गोष्ट तरलतेने बघणं हा दृष्टिकोन मावळला की मग त्यातील सौदर्य आपसूकच लयाला जातं. मग ती गोष्ट चांगली वाईट हा दुय्यम मुद्दा असेल. पण त्याकडे माझं बघणं हे कितपत सकारात्मक आहे. यावर कित्येकदा त्या गोष्टी चांगल्या असणारच यावर शिक्कामोर्तब करता येतं सुख ही अशीच तरलतेने बघण्याची अनुभवण्याची गोष्ट आहे. सुख अनुभवण्यासाठी, जगण्यासाठी जास्त काही करायचं नाही. थोडंसं सकारात्मक वागायचं. ते कसं ?

स्वतःच्या दुःखात इतरांनी सहभागी व्हावं ही आंतरिक अपेक्षा असतेच; फक्त ती बोलून दाखवली जात नाही. कारण बोलून दाखवल्यास दुःखाची प्रखरता कमी आहे. असा गैरसमज इतरांना होईल याची सुप्त भीती असते मनात. नाही का ? आपल्या दुःखात इतरांनी सहभागी व्हावं त्यानं दुःख हलकं होईल. कमी वाटेल. दुःखातून सावरता येईल. पण आपलं दुःख संपल्यानंतर मिळणारं सुख सुद्धा आपल्या वाट्याला असतं. या सुखात आपल्याला कोण आठवतं. आणि या सुखात आपण किती लोकांना सहभागी करून घेतो. त्यावर आपल्या सुखाच्या क्षणांची किंमत ठरते.

सरतेशेवटी महत्वाचं काय ?
तर आपल्या दुःखात इतरांनी सहभागी व्हावं असं मनोमन वाटत असेल तर स्वतःच्या सुखात इतरांना मानाचं पान देणं योग्य. कदाचित ते सुख स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदासाठी जास्त खर्च होईल. आणि यदा कदाचित असं झालं. तर सुखाच्या व्याख्येची खरी प्रचिती अनुभवली जाईल. हे निश्चित !

रोहित गिरी