सुशांतसिंग प्रकरण : पोलिसांच्या बदनामीचे एक, दोन नव्हे तर तब्बल ८० हजार पुरावे

26

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता बराच काळ लोटला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूवरून चाललेला वाद अजूनही संपलेला नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी केला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर एक, दोन नाही तर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आले होते. त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

पोलिसांच्या सायबर सेलनं याबाबत एक अहवाल तयार केलाआहे. त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातील नाहीत. तर पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, इटली, जपान, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स इत्यादी देशातून या पोस्ट करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थान टाइम्स या आघाडीच्या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सायबर सेल या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे. फेक अकाउंट उघडून पोलिसांची बदनामी करणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलंय.