समीर गायकवाड
वासनांचं शमन कसं करायला हवं, वयात येतानाच्या लैंगिक भावनांचं रूपांतर खळाळत्या झऱ्यात होऊ द्यायचं की त्याचं लिंगपिसाट पिशाच्च होऊ द्यायचं याविषयी आपण चकार शब्द बोलत नाही. स्त्रियांविषयीचा आदर केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी आपण कुठलीही ठोस पाऊलं उचलत नाही. डिजिटल युगाच्या काळात सेक्सची भूक विकृतीत बदलत जात असताना आपण सगळे मूक बसून असतो.
एका विशिष्ठ वयात आपल्यातील अनेकांनी छुपं सेक्सशमन केलं आहे मग ते व्हिडीओप्लेयरवर व्हीसीडी पाहून असेल, वैयक्तिक एकांतातले इंद्रिय शमन असेल वा कुठे तरी कंड शमावून घेतला असेल मात्र आजही आपल्या घरी ‘दादा’ने तसलं काही केलं तर त्याला लाईटली घेतलं जातं, त्यावर प्रसंगी विनोदही केले जातात मात्र त्या दादाची हजेरी घेतली जात नाही की मोकळेपणाने बोलून त्याच्यातला तुंबलेला पुरुष उकरून काढला जात नाही !
सेक्सविषयक भावनांचा निचरा कसा करायचा याचा गुंता न सुटलेला हा अजस्त्र आकाराचा समाज कुणालाही गिळू शकतो, कुणालाही पीळू शकतो. मधूनच याचा संताप उद्रेक उसळून येतो आणि पुन्हा झटक्यात निवून जातो ! हे आता नित्याचे झालेय. मूळ समस्येला जोवर हात घातला जात नाही तोवर हे असे कालानुगणिक उमाळे येत राहणार.
सर्वांनाच पखालीला इंजेक्शन द्यायचं असेल तर हाल्या मोकाटच राहणार आहे. तो कधी कुणावर उडेल नेम नाही. मग त्या अत्याचाराचं प्रकरण अत्यंत क्रूर, भयावह आणि अंतर्बाह्य हलवून टाकणारं असेल तरच त्याला प्रसिद्धीची स्पेस मिळणार. अन्यथा त्याची नोंद सरकारी फायलीत एफआयआरच्या कबरीत दफन होणारच.
एरव्ही रोजच शेकड्याने बलात्कार आपल्या देशात होत असतात तेंव्हा आपल्याला षंढ संतापाचे खोटेनाटे उमाळे येत नसतात यातच आपला दुटप्पीपणा ठासून भरलेला दिसतो.
ज्या समाजाला मूळ रोगावर उपचारच करायचा नाही तो असं ढोंग करतच राहणार ! भोंगळ संतापाचे भकास दिवे मस्तकी घेऊन फिरणाऱ्या समाजाकडून आणखी काय अपेक्षा करणार ?