बॉलीवुडचे ‘शेहनशाह’ अमिताभ बच्चन आज 78 वर्षाचे झाले आहेत. या वयातही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ते नेहमी सज्ज असतात. अजूनही सिनेसृष्टीत त्यांची छाप आहे. बिग बिंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दर वर्षी हजारो चाहते त्यांच्या घराबाहेर जमतात. या वर्षीही चाहत्यांची गर्दी होईल असा अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. त्यामुळे अमिताभ यांचा बंगला जलसा बाहेरील सुरक्षा व्यवस्था आज वाढवण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन यांचे मूळ नाव अमिताभ हरिवंश बच्चन. यांचा जन्म 11 ऑक्टोम्बर 1942 साली अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते. तर आई तेजी बच्चन या मूळच्या पाकिस्तान येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. बच्चन अलाहाबादमध्ये ज्ञान प्रबोधिनी आणि बॉईस हायस्कुलमध्ये शिकले. त्यांनी नैनितामधील शेरवूड कॉलेजमध्ये कला शाखेत शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठात किरोडीमल महाविद्यालयातून विज्ञानशाखेतील पदवी घेतली. बिग बी कोलकाता येथील जहाजवाहतुक कंपनीत एजंटची नोकरी करत होते. त्यांनी अभिनय कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडली.
सात हिंदुस्तानी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर स्वतःच्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आणि गाजले. अमिताभ बच्चन यांचे 1970 मध्ये अभिनेत्री रेखा यांच्यासोबत अफेर होते. आजपर्यंत त्यांच्या प्रेमाची चर्चा सुरुचं आहे. परंतु दोघांनीही कधी प्रेमाची कबुली दिली नाही. रेखा आणि अमिताभ यांचे लग्न होऊ शकले नाही. 1973 मध्ये अभिनेत्री जया भादुरीशी यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मूलगा अभिषेक बच्चन हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांची मुलगी श्वेता बच्चन ही चित्रपटसृष्टीपासून दूर असते. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही यांची सून आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी आहे.
अमिताभ बच्चन आघाडीचे अभिनेते आहेत. 180 हुन अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. बच्चन हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. अमिताभ यांना चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी पार्श्वगायक, चित्रपट निर्माते आणि टिव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही काम केले आहे. फ्रांस सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. तसेच भारत सरकारने 1984 मध्ये पद्मश्री गौरव आणि 2001 मध्ये प्रद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. त्यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
परवाना, रेश्मा और शेरा, बडा कबुतर, अभिमान, गहरी चाल, अभिमान, चरणदास, कभी-कभी, अमर अकबर अँथोनी, अदालत, त्रिशूल, नमक हलाल, महान, शराबी, शहेनशाह, अग्निपथ, मोहब्बतें, हम किसी से कम नही, बागबान, सरकार, भूतनाथ, पा, पिकू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका सरकल्या आहेत. लाखोंच्या हृदयावर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवत आहेत.
वाढीदिवसाच्या खूप शुभेच्छा!