दहावीचा निकाल आणि आत्महत्या

32

आज सुट्टी भेटणार म्हणून खूप खुश होता तो. नुकतीच दहावी संपली आणि मस्ती सुरू हाच विचार त्याच्या डोक्यात होता.सुट्टी अगदी मज्जा मस्ती, ना कोणता विचार, ना कोणतं टेंशन यामध्येच घालवली. आज रिझल्ट कधी लागणार ही बातमी त्याने न्यूज वर वाचली.अगदी एक महिना होता त्याचा रिझल्ट लागायला, रिझल्ट ऐकूनच मन त्याचं खूप निराश झालं, १५६० विचार त्याच्या मनात घर करून बसले होते.विचारांनी डोक्यात थैमान घातलं होत.आता माझा रिझल्ट कसा असेल? कोणत्या पेपर मध्ये मी नापास झालो तर? हाच विचार डोक्यात चालत होता. अचानक तो खूपच टेंशन
घेऊन बसला होता. ना घरी कोणाशी बोलत होता, ना नीट काही सांगत होता. खूपच शांत होता तो. त्याला तसं बघून त्याच्या आईला खूपच टेंशन येत होतं. काय करावं ह्या मुलाचं, विचारलं तरी काही सांगत नाही म्हणून
आईदेखील टेंशन मध्ये होती.
रिझल्ट लागायला आता १५-२० दिवस आत्ता बाकी होते. जसजसे
दिवस सरत होते, तसतसा तो देखील टेंशन घेत होता. स्वतःला कमजोर समजू लागला होता, आई-वडील, भाऊ-बहीण सर्वच विसरला होता.तितक्यात त्याला आत्महत्येचा विचार आला. अनेक प्रश्नांची उत्तर शोधताना निराश झालेला तो…

विचार करता करता त्याला आत्महत्या हाच पर्याय योग्य वाटला. त्याने स्वतःला मी नापास झालो तर , या विचारांनीच कैद करून घेतलं होतं. तो आज घरातले बाहेर फिरायला जाणार या विचाराने आत्महत्येचा दुसरा चान्स मिळणार नाही, हेच विचार करू लागला. शेवटी न राहवून त्याने तुम्ही जा, मी बाहेर चाललोय हे सांगून बाहेर पाठवले. आईला त्याच्यावर शंका होतीच
म्हणून ती, तुम्ही जा मी घरीच थांबते बोलत होती, पण तरी ही त्याने जबरदस्तीने आईला पाठवलं. आता तो घरी एकटाच होता. अगदी निरव शांतता, त्याला खूप विचार येत होते. पण मी नापास होईन हा विचार काही जात नव्हता. कारण त्याच्या मनाने त्याला तेच पटवून दिलं होतं. शेवटी त्याने घरातील दोरी
आणि स्टूल घेतला, सर्व तयारीनिशीच होता. आता फक्त त्याला गाठ घालून मान घालायचं बाकी होतं. तो स्टूल वर उभा राहिला, तो मान त्या दोरीत घालणार तितक्यात त्याला समोर आईबाबांचा हसरा फोटो दिसला.
फारच खुश होते दोघे त्याच्यात. आईला पाहुन मात्र आता त्याच्या डोळ्यात आसवांनी घर केलं होतं, पाणी डोळ्यातुन ओघळू लागलं होतं. त्याने आता ती दोरी पंख्यावरून स्टूल ने काढली होती,आणि स्टूल बाजूला सारून तो पुन्हा विचार करत बसला होता.

ज्या आईने मला तिच्या गर्भात ९ महिने ठेवलं, बाबांनी मी
जन्मल्यानंतर कित्तीतरी गोष्टी मला पुरवल्या. सर्व लाड दोघांनी माझे पूर्ण केले. कधीच कोणत्या गोष्टीची कमी मला भासू दिली नाही. जी बहिण माझ्यापेक्षा लहान असून माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवते, भाऊदेखील भांडला तरी बाहेर नेहमी माझीच बाजू घेतो. इतकी प्रेम करणारी माणसं माझ्या जवळ असून देखील मी असं वागायचा विचार करतोय. या विचारांनी त्याला काही बालपणीचे किस्से आठवले. जर मला ठेच लागली की आईचं रडणं आठवलं. बरं नसल्यावर, आई नसल्यावर भावाने घेतलेली काळजी आठवली. सर्व काही आठवून तो खूपच रडत होता, त्याला कळलंच नाही की संध्याकाळ झाली. आईने दारावरची बेल वाजवली. आई
आली हे कळताच क्षणी त्याने पूर्ण घर आवरलं, आणि मग दरवाजा खोलला.

आई- अरे किती वेळ लावलास दरवाजा उघडायला? काय करत
होतास, इतका वेळ? तो मात्र शांतच होता. अरे बोल, काय झालं?

आईचे हे उद्गार ऐकून तो लगेच आईच्या जवळ गेला आणि
तिला मिठी मारून ढसाढसा रडू लागला, घरातल्या कोणालाच
समजत नव्हतं हा असा का वागतोय ते. आईने त्याला जवळ घेतलं आणि त्याच रडणं थांबवण्याचा प्रयत्न ती करत होती. असा का रडतोयस बाळा? काय झालंय का? आईच असं बोलणं ऐकून तो अजून रडत होता. शेवटी आई-बाबा, बहिण-भाऊ सर्वच जण त्याच्या समोर येऊन बसले. काय झालंय तुला? का बर रडत होतास? कशाला घाबरलाय का घरात?
काही टेंशन आहे का?

आई- अरे टेंशन असेल तर सांग आम्हाला, आम्ही काहीतरी
नक्कीच तुला मदत करू बाळा, पण असं शांत नको राहुस.
बाबा

भाऊ- कोण काही बोललय का रे तुला? सांग मला, मी बघतोच मग त्याला, का
रिझल्ट च काही टेंशन आहे का?
रिझल्ट हे ऐकताच क्षणी त्याने त्याची मान हलविली.

आई-बाबांनी दोघांनीही सोबत विचारलं, काय टेंशन आहे, आम्हाला सांग, आम्ही तुला
काहीच नाही बोलणार रे, पण असा शांत नको राहुस.त्याने बोलायला सुरुवात केली
आई बाबा मी आज आत्महत्येचा प्रयत्न केला …. हे ऐकताच सर्वजण घाबरले, आणि तू
अस का करायचं ठरवलं- बाबांनी विचारलं.त्याने सांगायला सुरुवात केली

आई या दहावीच्या रिझल्ट मध्ये मी जर नापास झालो तर, तुम्हाला खूप वाईट वाटेल आणि माझ्यामुळे नातेवाईकांमध्ये तुमची मान खाली झुकेल, आणि मला हे
नकोस वाटतंय.
आई- अरे गाढवा, तू फक्त तुझा विचार कर! आमचा किंवा नातेवाईकांचा नाही.
बोलणारे तर लाखो असतात, म्हणून तू काय त्यांचा विचार करणार का? आई खूपच
रडत होती. भाऊपण खूपच चिडला होता. बाबांनी त्याला तोंड धुवून फ्रेश हो आणि परत ये अस सांगितलं. तो फ्रेश होऊन
आला. आता त्या हॉल मध्ये फक्त निरव शांतता होती. आई-बाबा आणि भाऊ आम्ही चौघच होतो, बहीण बाहेर खेळत होती.

बाबांनी त्याला सांगायला सुरुवात केली. ऐक बेटा, आम्ही तुझ्याकडून कोणतीच अपेक्षा नाही करत, फक्त तू खूप छान शिकून मोठ्या पोस्टवर जावं
आणि तुझं नाव तू स्वतः कमवावं इतकंच आम्हाला वाटतं. आणि हो ऐक, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव. कधीच रिझल्ट हा आपली
पात्रता ठरवत नाही, आपण कसे आहोत हे आपण स्वतःच ठरवतो, रिझल्ट फक्त आपल्याला पास की नापास इतकंच सांगतो. त्यामुळे त्या रिझल्टपेक्षा, तू स्वतःवर जास्त विश्वास ठेवून रहा. इतकंच मी आणि तुझी आई तुला सांगू
शकतो. तुझ्या दादाला पण आम्ही नेहमी हेच सांगतो, त्याने सर्वकाही ऐकलं आणि त्याची मान आता शरमेने खाली झुकली. कारण
सर्वजण त्याला खुप चांगल्या प्रकारे समजावत होते, आणि तो असा वागला म्हणून स्वतःलाच वाईट वाटत होत. सर्वांचं ऐकून तो झोपी गेला, नवी उमेद घेऊन सकाळी उठला …

आज रिझल्ट होता, तीनच्या दरम्यान त्याने रिझल्ट पाहण्यासाठी website ओपन केली पण fail यामुळे तो घाबरत होता. त्याने रिझल्ट दादाला चेक करायला सांगितला, पण बाबांनी मात्र त्याला च पाहूदेत त्याची
प्रगती झाली की अधोगती हे सांगितलं.थरथरत्या हाताने सीट नंबर आणि आईच नाव भरलं … रिझल्ट पाहतो तर काय …!
डोळे उघडेच होते, बाबांनी हाक मारली, काय रे काय झालं?
तरीही त्याच उत्तर नाही, मग आईने विचारलं- अरे बोल?
तो आता मात्र एका जागी स्तब्ध बसला होता. आनंदीआनंद
झाला होता, जणू कोणीतरी आपल्याला पाहून खुश व्हावं, आणि फटाके फोडून नाचावं हेच त्याला वाटत होतं. थोड्याच वेळात तो आईबाबा, आईबाबा लवकर या म्हणून
ओरडत होता, दोघही जरा विचारातच पडले, काय झालं ह्याला म्हणून …? पाहतात तर काय 85 % मिळाले होते त्याला!
बाबांनी त्याला सांगितलं की बघ जर त्या दिवशी तु तसं वागला असतास तर, तुझं किती नुकसान झालं असतं आणि सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं पूर्ण आयुष्यच बरबाद झालं असतं, त्याने दोघांनाही मिठी मारली आणि दोघांचाही पाया पडल्या!
खुपच खुश होता तो …

कवितेतली मी

श्वेता शिंदे
८४२११५४६९४