वेब सिरीज: हॉलीवूडला टक्कर देणारी वेब सिरीज “SCAM 1992”

31

विशाल पट्टोपाध्याय

आता हॉलिवूड वाले कधी म्हणाले की आमच्याकडे The wolf of wall street आहे तर आपण म्हणू शकतो की आमच्याकडे Scam 1992 आहे. अनेकांना ही तुलना अतिशयोक्ती वाटू शकते की कुठे हॉलिवूडचा मुव्ही आणि कुठे हा, पण प्रत्येकवेळी हॉलिवूडच श्रेष्ठ हा अट्टहास सोडून जे जमलंय ते जमलंय असं खुल्या मनाने मानायला हवं आणि माझ्या मते हे इंडियन व्हर्जन मस्त जमलंय.

जसा Wolf of the wall street तुम्हाला पूर्णपणे खिळवून ठेवतो, अगदी मन भरेस्तोवर एन्टरटेन करतो तसा तत्कालीन भारतीय शेअर मार्केटच्या जगताची थरारक राईड तुम्हाला Scam 1992 घडवून आणतो. एका वाक्यात सांगायचे तर त्यांच्या जॉर्डन बेलफोर्टला हर्षद मेहता भारी टक्कर देतो.

कथेत वेगळं काही सांगण्यासारखं नाहीये. कारण कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि अनेकांना माहिती सुद्धा आहे. खास करून शेअर मार्केट मध्ये रस असणाऱ्यांना तर बिग बुल हर्षद मेहता माहिती आहेच. हा तो व्यक्ती ज्याचे आर्थिक हेराफेरीचे कांड 1992 साली बाहेर आले आणि आपली बँकिंग व्यवस्था व आर्थिक सुरक्षा धोरण किती तकलादू आहे हे अख्ख्या जगाला कळलं. जबरदस्त हुशारी असून सुद्धा केवळ माझंच सगळ्यावर वर्चस्व असायला हवं ही अतिघातक महत्त्वकांक्षा माणसाचं काय पतन करू शकते हे या सिरीज मध्ये पहायला मिळते.

दिग्दर्शक हंसल मेहता यांचं कौतुक एका गोष्टीसाठी करावंसं वाटतं की त्यांनी तेव्हाचा शेअर मार्केट आणि मनी मार्केट कश्याप्रकारे काम करत होतं ते अगदी सोप्प्या भाषेत समजावलं आहे. तरी अनेक टेक्निकल गोष्टी त्यातून मिसिंग आहेत ज्या शेअर मार्केटचं ज्ञान असणारा ओळखु शकतो. पण जर टेक्निकल गोष्टींवर अधिक भर दिला असता तर ती एक डॉक्युमेंटरी झाली असती आणि पहायला खूप बोअर झालं असतं. त्यामुळेच हंसल मेहतांनी शक्य तितकं याला मनोरंजनात्मक सिरीज राहू देण्याच्या उद्देशाने सोप्प्या भाषेत हा पूर्ण घोटाळा रंजक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतीक गांधीने 24 तास प्रॉफिटचाच विचार करणारा हर्षद मेहता उत्तम साकारला आहे. Sony Liv चे पुन्हा एकदा कौतुक करावेसे वाटते की एकामागोमाग एक दमदार सिरीज ते देत आहेत. तुम्हाला शेअर मार्केटचे ज्ञान असेल वा नसेल तरी ही सिरीज आवर्जून पहायला हवी. ज्ञान असेल तर शेअर मार्केटची मर्यादा तुमच्या मनी पुन्हा ठसेल आणि शेअर मार्केटचा श सुद्धा माहीत नसेल तर हा हर्षद मेहता तुम्हाला इंप्रेस करेल आणि शेअर मार्केटकडे खेचून घेईल. पण लक्षात ठेवायचं ही घोटाळेबहाद्दराची सिरीज आहे..प्रेरणादायी व्यक्तीची नाही !

अभिषेक बच्चनने साकारलेला हर्षद घेऊन Big Bull हा चित्रपट सुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे पण चित्रपटाला वेळेचं आणि सेन्सॉरचं बंधन असतं. त्यामुळे ही सिरीज त्यापेक्षा नक्कीच उजवी वाटते!