‘शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढणार आहे. शिवसेनेचा बिहारमध्ये ३० ते ५० जागा लढण्याबाबतचा विचार आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईत संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना बिहारचे प्रमुख हौसलेंद्र शर्मा हे उपस्थित होते. बिहार निवडणुकांमध्ये ५० जागा पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी म्हटले होते.
शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे. त्याचप्रमाणे जेडीयू या पक्षाचं चिन्ह बाण आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. असं म्हणत जेडीयू निवडणूक आयोगाकडे गेल्याने, शिवसेनेने पर्यायी चिन्ह निवडावे असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं. शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष नसल्याने शिवसेनेपुढे आपलं हक्काचं चिन्ह सोडण्याची वेळ आली होती. त्यानंतर नवीन चिन्ह घ्यायला शिवसेना तयार झाली. त्यानुसार शिवसेनेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट अशा तीन चिन्हांपैकी एक मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘बिस्कीट’ चिन्ह दिले आहे. यावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाला चिन्ह बलून मिळावं यासाठी पत्र लिहिल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने या वृत्तवाहिनीने दिलं आहे.