चौथीच्या ईतिहासात “गड आला पण सिंह गेला” या मथळ्याखाली एक धडा आहे. ज्यामध्ये नरवीर सुभेदार तानाजी मालुसुरे यांच्या कोंढाणा जिंकण्याचे वर्णन आहे. त्यानंतर नुकताच प्रदर्शित होऊन गेलेला तानाजी चित्रपट यांमुळे सिंहगडाला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. पुण्याजवळील सिंहगड एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सिंहगडावर एक विशाल ध्वज लावण्यात येणार आहे. ज्याकरिता पुणे महापालिका १ कोटी खर्च करणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयावर मात्र काही गडप्रेमींनी गडावरील प्राथमिक सुविधांबाबत प्रश्न ऊपस्थित केला आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या आग्रहावरून हा ध्वज उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दि.९ फेबृवारीच्या (मंगळवारी) महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ध्वज ऊभारण्यासाठी १ कोटी खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यामध्ये ३० मीटर उंचीचा ध्वज स्तंभ, विद्युत प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुशोभीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. आमदार तापकीर यांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचेसुद्धा रासने यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान महानगरपालिकेच्या या निर्णयावर गडप्रेमींनी काही प्रश्न ऊपस्थित केले आहे. सिंहगडावर जाण्यासाठी मुख्य मार्गावर असणार्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती अधिकच खराब होते. परिणामझ अनेकदा हा रस्ता बंद ठेवाव लागतो.त्यामुळे गडावर जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता आहे. येणार्या पर्यटकांना अनेकदा याकरिता हाल सोसावा लागतो. तसेच ईतर प्राथमिक सुविधांचसुद्धा गडावर अभाव आहे. अशावेळी ध्वज निर्मितीसोबतच प्रशासनाने या बाबींकडेसुद्धा लक्ष देणे गरजेचे असे मत व्यक्त होत आहे.
या बैठकीत समाधीस्थळाच्या विकासकामांच्या मुद्द्यांनासुद्धा प्राधान्य देण्यात आले. सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ परिसरात विकासकामे करण्यासाठी ७५ लाख रुपये खर्चाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये प्रवेशाद्वारावरील सुशोभीकरण करणे, समाधीस्थळामागील सीमाभिंतीची उंची वाढवणे, लॉनमधील मावळ्यांच्या पुतळ्यांना पर्यटकांकडून हानी पोहोचविण्यात येऊ नये म्हणून त्यास आयर्न कास्टिंग लावणे आदी कामांचा ऊल्लेख आहे.