मुंबई : दिनांक ११ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी आरोग्य बाबत ऑनलाइन योगा आणि मेडिटेशन विशेष कार्यशाळा श्री योग स्टुडिओ तर्फे आयोजित करण्यात आली होती. मासिक पाळीशी संबधित समस्या दूर होण्यासाठी सूर्यनमस्कार महिलांसाठी किती फायदेशीर आहेत हे योग शिक्षिका सौ. दीपा शिंदे व सौ. भारती राणे यांनी प्राणायाम व आसने यांचे झूम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन प्रात्यक्षिक दाखविले तसेच मार्गदर्शन केले. योग हा व्यायामाचा विषय नाही ती एक जीवनशैली आहे योग्य आहार-विहार ही आरोग्याची किल्ली आहे ऑनलाइनच्या कालावधीत मनावरचा ताण वाढणार आहे चिडचिड वाढणार आहे आणि ती कमी करण्यासाठी ताण घालवण्यासाठी योगा सारखे दुसरे अधिष्ठान नाही नियमित पणे दररोज योग करावा.
योग ही साधना असली तरी ती सहज करता येण्यासारखी आहे. पण सहज म्हणजे कशीही नाही. योगशास्त्र सांगत की, आसनापासून ओमकारपर्यंत काहीही करा पण शास्त्रशुद्धच करा. आसनाचे, श्वासाचे नियम असतात. ते समजून उमजून केले तरच फायदेशीर ठरतात. आणि म्हणूनच योगाभ्यास करायचा हे ठरल्याबरोबर आधी तो प्रशिक्षित व्यक्तिकडून नीट शिकून घ्यायला हवा असे प्रसंगी सांगितले.
महिलांमधील सिक्स सेन्स याचा मनाशी संबंध यासोबतच महिलांना वैयक्तिक नातेसंबंध, आरोग्यदायी व आनंदी कुटुंब, अशा विविध प्रकाराच्या विषयाचे मार्गदर्शन आयोजित कार्यशाळेत श्री शिवकुमार गिरी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक यांनी केले. योगासने व प्राणायाम करून आपणच आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो. योगामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो आणि मज्जासंस्थेला विश्रांती मिळते. आजार होऊ नयेत यासाठी योगासने व प्राणायाम केले पाहिजे. त्यामुळे हार्मोन्स चे संतुलन राखले जाते आणि बऱ्याच प्रमाणात मासिक पाळीपूर्वीची लक्षणे कमी करता येतात. महिलांमध्ये प्रामुख्याने कंबरदुखी, पाठदुखी, मासिक पाळी च्या तक्रारी असतात यावर योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार नित्यनेमाने करून आजच्या या धावपळीच्या व धकाधकीच्या काळात प्रत्येकाने “करो योग रहो निरोग” हे ब्रीदवाक्य अंगीकारणे गरजेचे आहे. ‘केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे’ म्हणजेच आपले आरोग्य आपल्या हाती असताना मात कशी करता येईल यावर श्रीमती गंगाजल पाटील यांनी माहिती दिली. बऱ्याच महिलांनी व युवतींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. योगा आणि मेडिटेशन चे महत्व आजच्या धकाधकीच्या जीवनात किती अनन्यसाधारण आहे हे महिलांना विशेषतः कार्यशाळा झाल्यावर जाणवले. उपस्थित सर्व महिलांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.