रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९ करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी या निधीसाठी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदींचे या योगदानासाठी आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुकही केले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अशा रितीने एकत्र होणारा निधी, गरजूंच्या उपचारासाठी मदतीचा हातभार ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.