‘२६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल’ मुख्यमंत्र्यांचा ‘बेस्ट’ प्रवास

12

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. नरिमन पॅाईंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत  (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) इलेक्ट्रिक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम’कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बस सुरु असून एकूण 340 बस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रिक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.