‘सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशन मरखेल’ बनले लोकसहभागातून ग्रामविकासाचे ‘मॉडेल’

9

देगलूर: तालुक्यातील मरखेल गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद, शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि गावातील इतर सुशिक्षित युवकांनी २ वर्षांपूर्वी ‘माझं मरखेल माझं अभिमान’ नावाच्या एका सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली. दिवसेंदिवस अनेक समाजोपयोगी कामे होऊ लागले. या अभियानाचे रुपांतर पुढे ‘सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशन’ मध्ये करून त्याची नोंदणी करण्यात आली.

सलग दोन वर्षापासून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवून या अभियानाने सामाजिक बदलाचा नवा पायंडा पाडला आहे. गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा चेहरा-मोहरा बदलण्यात सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशन मरखेलचा मोलाचा वाटा आहे. स्वेच्छेने लाखो रुपयांची देणगी जमा करून त्याचे योग्य विनियोग करून गावाच्य शैक्षणिक, सामाजिक आणि भौतिक विकासात कमालीचे योगदान देण्यात आले आहे. युवकांनी आणि गावातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन गावासाठी काय काय चांगले करू शकतात यांचे जिवंत उदाहरण म्हणजे सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशन मरखेल आणि त्यांचे कार्य. इतर गावांनीही आदर्श घ्यावा असेच या अभियानाचे स्तुत्य काम आहे.

गत वर्षी प्रमाणे याही दीपावली पाडव्या निमित्त सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशन मरखेल ची २ री सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने गावातील अनेक महत्वाच्या विषयांवर, समस्यांवर आणि त्यांच्या उपायोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पुढील धेय्ये धोरणे ठरवण्यात आले. जिल्हा परिषद कन्या शाळा मरखेल येथे आजच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिपप्राशा कन्या मरखेल साठी 3 स्मार्ट टीव्ही देण्यात आले. आदर्श शाळा निवड झाल्यामुळे कन्या शाळेचे मुख्याध्यापक, उपस्थित स्टाफ व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास सर्वोदय ग्रामविकास फाउंडेशन मरखेलचे सर्व आजीव देणगीदार सभासद, गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक उपस्थित होते.