38 मेट्रीक टन ऑक्सिजन नागपुरात पोहोचले! देवेंद्र फडणवीस यांनी मानले निको समूहाचे आभार

5


नागपूर शहरात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढले असून मोठया प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढली होती. याच पार्श्वभूमीवर नागपूरसाठी 38 मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन दोन टँकर आज सकाळी पोहोचले. त्यातून शासकीय आणि खाजगी रूग्णालये मिळून चार ठिकाणी 4180 जम्बो सिलेंडर्स भरले जातील. त्यातून सुमारे 3000 हून अधिक ऑक्सिजन बेड्सची गरज भागविली जाणार आहे.


हे टँकर आज सकाळी बुटीबोरी येथे दाखल झाले. याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष श्री बसंतलाल शॉ आणि सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल यांचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. हे दोघेही मूळचे नागपूरकर असल्याने त्यांनी पुढाकार घेत एक दिवसाआड एक टँकर नागपूरला देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान दिला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि त्यांचे बोलणे करून दिले होते.

21 एप्रिल रोजी हा समन्वय घडवून दिल्यानंतर आज 24 एप्रिल रोजी दोन टँकर्स नागपुरात पोहोचले. सिलतारा, रायपूर येथील जायसवाल निको प्रा. लि. या इंटिग्रेडेट प्रकल्पातून हा ऑक्सिजन नागपुरात आला. हा ऑक्सिजन नागपुरात आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा निकोनेच केली. यामुळे मोठा दिलासा नागपूरला मिळणार आहे