राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात १२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे.
स्थानिक पातळीवरही ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
तसेच आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.