राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 41 तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी 82 वसतिगृहे उभारण्यात येतील.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील परळी, केज, बीड, गेवराई, पाटोदा व माजलगाव, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व पाथर्डी तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड या दहा तालुक्यात मुला-मुलींसाठी 100 क्षमतेचे प्रत्येकी एक याप्रमाणे 20 वसतिगृहे उभारण्यात येतील.
पहिल्या टप्प्यातील वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाड्याच्या इमारतींमध्ये हे वसतिगृह याच शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येतील. आज स्व. मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतलेला हा निर्णय हीच स्व. मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली असेल असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.