इंदापूरला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाबाबत संजय शिंदेंनी सोडले मौन

7

आमदार संजय शिंदे सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते क्वारंटाइन आहेत. मात्र, इंदापूरला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाबाबत आपले मौन सोडले आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूरला उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून तीव्र स्वरूपाचा विरोध सुरू झाला आहे. 

फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये आमदार संजय शिंदे यांनी म्हटले आहे की, मी संजयमामा शिंदे. माझ्या व माझ्या नेत्यांच्या संबंधित विरोधक नेहमीच गैरसमज व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पवार कुटुंबीय यांच्या संदर्भात माझ्या जीवनात असाधारण महत्त्व आहे आणि ते मी माझ्या हृदयात जपलंय. 

उजनी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे १ थेंबही पाणी मी इतरत्र वळवू देणार नाही, अशी भूमिका आमदार संजय शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

 या योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश देण्यात आला असून चार महिन्यांत सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर योजनेचे काम पूर्ण होणार असून जलसंपदा मंत्रालयाने याबाबत सरकारी निर्णय पारित केल्याचे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले होते.