सौ.भारती सावंत, मुंबई
चला जाऊ गावाला
करू निसर्गाचे पान
हिरव्या डोंगरदऱ्या
घाट वळणदार छान
पाणंदीच्या वाटेने घरी चालले होते. हळूच पाठीमागुन वाऱ्याची झुळूक आली.थकलेल्या मनाला उभारी मिळाली. वाऱ्याने कानात शीळ घातली नि मी थोडीशी दचकलेच! निसर्ग नावाच्या थोर कलावंताची ती शीळ होती. जणू काही पुटपुटला वारा “कसं वाटतंय पोरी! उन्हातान्हांत ! आमच्या निसर्गातील झाडे, वारे,ऊन्हं,पाऊस नि थंडीच तुम्हाला सुखावते. परंतु तुम्ही माणसं आम्हाला नष्ट करता, झाडे तोडता, जंगलाच्या या जागेवर सिमेंट, काँक्रीटच्या इमारती बांधता नि लावता आमची विल्हेवाट! पण आम्ही कलावंत असतो, नि तुम्ही माणूस ‘नकलावंत’. आमचीच नक्कल करता.
पहा आमच्यापैकी वृक्षवेली, लता, रोपटी किती उपयोगी आहेत! फळे, फुले,साली, पाने नि लाकूडही देतात. परंतु तुम्ही मानव वृक्षतोड करून बनवून टाकता त्याचे वाळवंट! ही धरणीमाता त्यामुळेच आक्रंदन करत असते.तुम्ही तिच्या लेकरांवर अत्याचार करता नि पुन्हा पाऊस पडत नाही म्हणून तुम्हीच रडत राहता. तुम्ही ध्यानात ठेवत नाही की आपण सारी देवाची लेकरे आहोत. तुम्ही बुद्धिमान असून बोलूही शकता म्हणून आमचा संहार करता. मग पहा वारा, पाऊस, तुम्हाला वेळेत नि नियमित स्वरूपात मिळत नाही. मग ऋतूचक्र बदलल्याने तुमच्या शेतीच्या उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम होतो. शेतातील उत्पन्न घटल्याने तुमच्यातीलच काहीजण आत्महत्या करतात. त्यात आमची काय चूक?
आम्ही फक्त तुम्हावर हिरवाईचे दान उधळत असतो.तुम्ही सोन्याचे अंडे देणार्या कोंबडीप्रमाणे आमची बेसुमार कत्तल करता नि पुन्हा अश्रु ढाळत राहता,आमच्या नावाने बोटे मोडत राहता. अजूनही वेळ आहे मानवा, कुऱ्हाड हाती घे परंतु ती वृक्ष तोडायला नव्हे तर वृक्ष लावून जोपासायला! मग बघ वसुंधरा तुला हिरवे लेणे भरभरून देईल. ही काळी आई तुला सर्वस्व बहाल करेल. डोंगरदऱ्यां नि टेकड्या तोडून त्यांच्या सौंदर्याचा ऱ्हास न करता वाढू दे सृष्टीचं हे लेणं! देवाजीने हे तुझ्यासाठीच निर्मिले आहे. तुच पैशाच्या मोहापायी सर्वांना तोडून धरणे, रस्ते बांधून सृष्टीचं हे लोभसवाणं देणं नष्ट करतोस. तू आमचे महत्व पार विसरून गेलास! डोळ्यावर मोहाची पट्टी बांधून बसला आहेस! त्यामुळेच हे अनमोल वैभव डोळ्यांनी लुटण्याऐवजी पर्यावरणाचा ऱ्हास मांडला आहेस! आकाशातील चंद्र, सूर्य, तारे, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण डोळ्यांत भरून घे. पावसाळ्यात वसुंधरेवर इरे मखमाली गालिच्यावर पडणारे दवबिंदू मोत्यांप्रमाणे चमकतात. किती रमणीय दृष्य!साठवण तुझ्या डोळ्यांत!विविध रंगांची, आकारांची फुलपाखरे, सुगंधित फुले कशी वाऱ्यावर डोलत असतात. पक्षी,पाखरे त्यांची घरटी झाडांवर बांधून पिल्लांची काळजी घेतात.
फुला फुला वर चिवचिवत बागडत असतात. वृक्षांवर उडतात. फुलपाखरे,भुंगे फुलांवर मनसोक्त बागडतात. किती भाग्यवान आहेस तू मानवा! परमेश्वराने इतकी सुंदर ही सृष्टी बनवली त्याचा आस्वाद घे. निळ्या हिरव्या डोंगर दऱ्यात, त्यातून वाहणारे खळखळणारे झरे ,नद्या सृष्टीच्या तुला मोहित करत नाहीत का रे? निसर्ग तुमचा गुरु आहे. तुम्ही त्यालाच त्रास देता? हिमालयावर बर्फ पडल्यावर तो चंदेरी मुकुट घातल्याप्रमाणे चमकतो. किती मोहक नयनरम्य दृष्य! तुम्ही मानव त्यां डोंगरांना उघडेबोडके बनवता. पावसाळ्यात शिखरावरून खळाळत वाहणारे झरे जणू तुला भेटायला येतात. पण तू त्यांना तिथेच अडवतोस. त्यावर धरणे बांधून आमच्या सर्व अंगांना तू बांधून ठेवतोस. मनसोक्त वाहू देत नाहीस निसर्गाचा वैरी बनू पाहताहेस! अरे मानवा! आमच्या कुशीत तू राहतोस तुझ्याप्रमाणे पशुपक्षीही आमचीच लेकरे. त्यांना दु:खी करण्याचा तुला काय अधिकार! बुद्धीभ्रष्टाप्रमाणेच वागतोस! बाप्पाला तुझे वागणे मुळीच आवडत नाही. म्हणून दुष्काळ, महापूर, भूकंप, महामारीची शिक्षा तो करत असतो. अजूनही वेळ आहे. कर सुधारणा वागण्यात आणि आमचा विध्वंस करणे बंद कर. आमच्याशी मैत्रीचा हात पुढे कर मग पहा आम्ही भरभरून आमचे हे लेणं तुझ्या झोळीत टाकू.