आम्ही टाळ वाजवू मात्र टाळे तोडणार नाही; भाजप अध्यात्मिक सेलच्या तुषार भोसलेंना ह.भ.प. सचिन पवारांचं प्रतिउत्तर

3

मंदिर बंद उघडले बार
उध्दवा धुंद तुझे सरकार…
असं म्हणत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी काही दिवसांपासून आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र, अजूनही शासनाने मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. भाजपा मंदिरं उघडण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी पुन्हा ५ नोव्हेंबरपासून तुळजापुरात भाजपा अध्यत्मिक सेल बेमुदत ठिय्या देणार आहे. तत्पूर्वी तुषार भोसले यांनी मंदिरं उघडा अन्यथा टाळे तोडू अशी भूमिका घेतली होती. त्याला वारकरी दर्पण चे संपादक ह.भ.प. सचिन महाराज पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

“मंदिरांचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय आहेत. आम्ही टाळ वाजवू मात्र टाळे तोडणार नाही. वारकरी नसणाऱ्या माणसांनी वारकरी संप्रदायाबद्दल बोलू नये.” असे खडे बोल वारकरी दर्पणचे संपादक ह.भ.प. सचिन महाराज पवार यांनी आचार्य तुषार भोसलेंना सुनावले आहेत.

आचार्य तुषार भोसले यांच्या भंपकपणा मुळे मंदीरे उघडण्याच्या विषय चिघळला आहे. कार्तिक वारी संदर्भात वारकरी नेत्यांनी तुषार भोसले यांच्या पध्दतीने न जाता वारकरी पध्दतीने हा विषय मांडायला हवा. प्रगल्भ, निष्ठावंत वारकरी नेत्यांनी पुढे यायला हवे. अशी कळकळ त्यांनी व्यक्त केली. विषय वारकऱ्याचे, साऱ्या आंदोलनाला बळ वारकऱ्याचे मात्र चमकोगीरी भलत्यांची हे खपवून घेतले तर वारकऱ्याचे प्रश्न कधीच सुटणार नाही. हे वास्तवही त्यांनी अधोरेखित केलं आहे.