दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकजण जखमी कर्नाटक सीमेवरील तीन गावांत चोरट्यांचा हैदोस, तुंबरपल्लीत लाखांचा ऐवज लंपास

134

एस. आय. शेख
देगलूर (जिल्हा नांदेड) :

तालुक्यातील सीमावर्ती भागातील मरखेल, मुक्रमाबाद व कर्नाटक राज्यातील होकर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात हल्लेखोरांनी अक्षरशः हैदोस घातल्याचा थरारक प्रकार शुक्रवारी (दि. २०) रोजीच्या मध्यरात्री घडला मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुंबरपल्ली येथे दरोडेखोरांनी घरात घुसत एका वृद्ध इसमास मारहाण करून सोन्याचे दागिने व रोख असा एक लाख सोळा हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे सीमावर्ती भागात पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याच्या भीतीपोटी नागरिकांचा थरकाप उडाल्याचे दिसून येत आहे.

तुंबरपल्ली येथील ज्येष्ठ नागरिक रामराव हुलप्पा रावीकर हे आपल्या सून व नातीसह शुक्रवारी रात्री घरी झोपले होते. उर्वरित मंडळी ही अन्य गावी पाहुण्यांकडे गेले होते. नेमकी हीच संधी साधून अज्ञात तीन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास घराच्या प्रवेशद्वाराचे कडी काढून आत प्रवेश केला. घरातील रोख ठेवलेले ९२ हजार रुपये व आठ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख सोळा हजारांचा ऐवज लंपास केला. आवाज येत असल्याने रामराव रावीकर हे उठले असता हल्लेखोरांनी मारहाण करून त्यांना दुखापत केली.

याच मध्यरात्री तुंबरपल्लीच्या दरोड्यापूर्वी या चोरट्यांनी मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हंगरगा (खुर्द) येथील एकाच्या घरात घुसून त्याची एम. एच. १२ एसएन ४१६२ या क्रमांकाच्या स्कुटीची (दुचाकी) चोरी केली. उपरोक्त दुचाकी वाहन तुंबरपल्ली येथील घटनेतून वापरली. ही स्कुटी (दुचाकी) येथेच सोडून चोरटे पसार झाले. सदरची दुचाकी ही मरखेल पोलिसांनी जप्त केली आहे.

शिवाय कर्नाटक राज्यातील सीमेवरील होकर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हंगरगा (बु.) याठिकाणी तीन घरांमध्ये चोरट्यानी प्रवेश मिळवीत एका ठिकाणाहून चार हजारांचा ऐवज लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी व श्वानपथक यांचेकडून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हल्लेखोरांचा माग लागू शकला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे, देगलूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, मरखेलचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, मुक्रमाबाद ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुंबरपल्ली येथे भेट दिली आहे. या प्रकरणी मरखेल व मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले असून, सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर व कमलाकर गड्डीमे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.