मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केलं वारकऱ्यांना आवाहन

3

महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही, पण सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. काल ते समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे, असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे.