“अमित शाहांनी आदिवासींच्या घरी केलेलं जेवण; फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेलं” : ममता बॅनर्जी

3

केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे नेते अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केलं. आदिवासी कुटुंबाच्या घरी अमित शाह जेवत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आदिवासी कुटुंबाच्या घरी अमित शाह यांनी पाहुणचार घेणं हे केवळ नाटक होतं. अमित शाह यांच्यासाठी बनवलेलं जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवण्यात आलं होतं. असा आरोप करताना ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हे पदार्थ ब्राह्मण आचाऱ्याकडून बनवून घेण्यात आलाचाही ममता यांनी दावा केला.

बिहार निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुढच्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बिहारमधील विजयानंतर भाजपाने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला आहे. भाजपाने पश्चिम बंगालमधील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. याच निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांचा पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाऊन आले. बांकुडा जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या अधिक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजापाला येथे यश मिळालं होतं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत भाजपला यश मिळेल अशी आशा भाजप नेतृत्वाला आहे. त्यासाठी पूर्व तयारी म्हणून अमित शहा यांनी बंगाल दौरा केल्याचं म्हटलं जातंय.