मराठा समाजाचे आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील जेष्ठ नेतेच कारणीभूत असल्याचा आरोप भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘एकदा वक्तव्य केल्यावर त्यावर काय प्रतिक्रिया येतात, त्याचा त्यांनीच अभ्यास करावा. त्यांची योग्यता लोकांनी ठरवावी अशी प्रतिक्रिया कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आज एकमेकांवर टीका करायची गरज नाही. एकत्र राहून आरक्षणाबाबत मार्ग काढावा लागेल. ते नेमकं काय बोलले हे मला माहित नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्षे लढत आहेत, त्यांना श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास आहे. असं रोहित पवार यांनी म्हणटले आहे.
उद्या आपली पिढी आपल्याला जाब विचारेल तेंव्हा त्यांना कोणत्या तोंडाने उत्तर द्याल. शरमेने मान खाली घालावी लागेलं. किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत बघणार आहात. हा प्रश्न तुम्हीच मार्गी लावला पाहिजे. कारण अजूनही तेच सत्तेत आहेत. जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. अशा शब्दात उदयनराजेंनी सत्तेतील मराठा नेत्याना प्रश्न केला आहे.