‘ही’ नावे चर्चेत, तोलामोलाचा नेता होणार काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष; आज घोषणा होण्याची शक्यता

525

काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मंगळवारी रात्री उशीरापर्यंत काँग्रेसमध्ये खलबते सुरु होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, यांनी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा इत्यादी प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यामुळे बुधवारी काँग्रेस नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा करेल अशी शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, मंत्री यशोमती ठाकूर आणि राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येणाऱ्या काळात शिवसेना,राष्ट्रवादी सोबत आघाडी करून निवडणूक लढवल्यास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तोलामोलाचा नेता असावा यादृष्टीने अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता आहे. केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडण्याची शक्यता असून सातव, चव्हाण आणि पटोले यांच्यापैकी एका नेत्याकडे पदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे.