‘चलो बुलावा आया है’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

5

मनोरंजन क्षेत्रासाठी एक वाईट बातमी आली आहे. भजन सम्राट लोकप्रिय गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. नरेंद्र चंचल यांनी अखेरचा श्वास ८०व्या वर्षी घेतला. दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुपारी 12 च्या सुमारास दीर्घकालीन आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे.

ते गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होते. नरेंद्र चंचल यांनी अनेक भजनांसह हिंदी सिनेमांतील गाणी सुद्धा गायली आहेत. विशेषत: भजन गायनांसाठी नरेंद्र चंचल प्रसिद्ध होते. धार्मिक वातावरणात ते लहानाचे मोठे झाले होते. कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळाले. त्यांनी ‘बॉबी’, ‘बेनाम’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ यासारख्या अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत.

गायक दलेर मेहेंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. ‘गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दु:ख झाले’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. चलो बुलावा आया है माताने बुलाया है… या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले. क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही चंचल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.