काल रात्री साडेआठ ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सागरेश्वर हणमंत बनसोडे (रा. भुरकवडी) या तरुणाने चक्क पोलिस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
याबाबत हणमंत आनंदा बनसोडे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, भुरकवडी येथील बनसोडे यांच्या शेतजमिनीतून काही लोक शेती पिके चोरून नेत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार बनसोडे हे शेत जमिनीची वहिवाट करीत आहेत.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, प्रभारी नायब तहसीलदार प्रताप राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख आदी तळ ठोकून होते. त्यानंतर रात्री उशिरा अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून त्याठिकाणी अग्निशामक दलाचे एक वाहन, रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती, तसेच अनुचित प्रकार घडू नये, म्हणून टॉवरच्या खाली गाद्या अंथरण्यात आल्या होत्या. रात्री अचानक झालेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिस कर्मचारी दऱ्याबा नरळे यांनी सागरेश्वर बनसोडे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
त्यांनी संबंधिताचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर तो टॉवरवरून खाली उतरला. सुमारे तीन तास हा थरार सुरू होता.
शेती पिकाच्या चोरीबाबत पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याबाबत या युवकाने हे आंदोलन केले आहे.