गोल्डमॅन सचिन शिंदेंची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

248

पुणे- अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे नामक गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सचिन शिंदे हा २९ वर्षीय होता. भरदिवसा हमरस्त्यालगत झालेल्या या घटनेने लोणीकंद गाव परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये त्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास लोणीकंद येथे नगर हमरस्त्यालगत एटीएम समोर सचिन शिंदे हा तरूण गप्पा मारत थांबलेला असताना दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरापैकी एकाने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली व पळाले. थेट डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सचिन शिंदे यास स्थानिकांनी तातडीने उपचारासाठी हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लोणीकंदमध्ये सचिन शिंदे हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. शिक्रापूर आणि रांजणगाव एमआयडीसी भागामध्ये त्याची काही वर्षांपासून दहशत होती. एका प्रकरणात तो येरवडा तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. हीच संधी साधून हल्लेखोरांनी सचिनवर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.