परभणी येथे जायकवाडी वसाहतीतील कल्याण मंडपम्
सभागृहासह आवारात 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व महापालिका प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आपल्या परभणी दौर्यात परभणीत 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाईल, असे जाहीर केले होते. प्रत्येक तालुकास्थानी 30 खाटांचे कोविड सेंटर उभे केले जातील, असेही नमूद केले होते. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने या जम्बो कोविड सेंटर संदर्भात काही जागांची पाहणी केली. त्यानंतर महापालिकेच्या मालकीच्या कल्याण मंडपम्च्या इमारतीस हिरवा कंदील दिला.
या कल्याण मंडपात दोन मोठ मोठे सभागृह आहेत. तसेच स्वतंत्र अशा खोल्याही आहेत. या कल्याण मंडपम्चा परिसरही मोठा आहे. चारही बाजूंनी संरक्षण भिंत आहे. त्यामुळे कल्याण मंडपम्ची ही इमारत कोविड सेंटरच्या दृष्टीने सुरक्षित आहे.
असा अभिप्राय नोंदवून प्रशासनाने महापालिका प्रशासनास या जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीबाबत स्पष्ट शब्दात कल्पना देवून तेथील महापालिकेचे काही विभाग तसेच साहित्य तात्काळ हटवावेत, अशा सूचना दिल्या. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून या इमारतीत कोविड सेंटर उभारणी संदर्भात हालचाली सुरु झाल्य होत्या. मात्र, हे सेंटर नेमकं कधी सुरू होईल, हे स्पष्ट झालेलं नाही.