मुंबईच्या किनाऱ्यापासून 170 किमी अंतरावर समुद्रात एका मालवाहू जहाजाला आग लागली आहे. मुंबई हायजवळ रोहिणी नौकेला काल रात्री ८ च्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे इंजिन रूमनेही पेट घेतला होता. या जहाजाला लागलेल्या आगीत एक खलाशी जखमी झाला असून तीन खलाशी बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाचे जहाज व विमान बचाव कार्यासाठी पोहोचले आहेत.
दरम्यान, जखमी खलाशाला ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरने मुंबईत आणण्यात आलि असून त्याला रुग्णालयात ऊपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामधून काही जणांना दुसऱ्या नौकेने रोहीनी या बोटीतून रेस्कू करण्यात आले. मुंबईपासून 92 मैल सागरी अंतरावर ओएनजीसीची बॉम्बे हायअंतर्गत विस्तारित तेलविहीर आहे. या तेलविहिरीजवळ काम करणाऱ्या ‘रोहिणी’ या नौकेला शनिवारी आग लागली. त्यानंतर नौकेतील अधिकाऱ्यांनी तटरक्षक दलाच्या वरळीतील केंद्राकडे मदतीची विनंती केली. यावेळी ‘अल्बाट्रॉस’ हे व्यापारी जहाज जवळच होते. त्या जहाजाला तत्काळ घटनास्थळी जाण्याची विनंती तटरक्षक दलाने केली.
तटरक्षक दलाने विशेष टेहळणी विमानही रत्नागिरीहून धाडले. या जहाजाने दोरखंडाचा उपयोग करीत ‘रोहिणी’ नौकेला तेथून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. परंतु ‘आयसीजीएस समर्थ’मधील तटरक्षक सैनिकच भर समुद्रात नौकेवर गेले. ही आग विझवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून सध्या बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याचं सांगितले जात आहे.