‘शिर्डी’ साई मंदिरात भक्तांना भारतीय पोशाख परिधान करून येण्याचा नवा नियम लागू

7

लॉकडाउनच्या काळात बंद असलेली मंदिरे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. तसेच शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानाने नवीन नियम जारी केली आहे. शिर्डीमधील साई मंदिरही खुले केले असून दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. यामध्ये कपडे परिधानावरून मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे. मंदिर परिसरात फ्लेक्स बोर्ड लावून भक्तांना सूचना देण्यात आली आहे की, समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करावी. असा निर्णय साई संस्थानच्या वतीने घेण्यात येणार आहे.

कोरोना महामारीमुळे गेली 8 महिने साईबाबा मंदिर बंद होते. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला त्यांनतर साई संस्थानाने ही सूचना भक्तांसाठी दिली आहे. ‘मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून येणे ही भारतीय संस्कृती नाही, महिला किंवा मुली तोकडे कपडे घालुन गेल्यास भक्त देवांकडे कमी आणि महिलांकडे जास्त बघतात. त्यामुळे महिलांनी भारतीय संस्कृतीचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया महिला भक्तांनी दिली आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावे अशा आशयाचे पोस्टर देखील साईबाबा मंदिराच्या परिसरात लावण्यात आले आहेत.

शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश – विदेशातूनसुद्धा भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावं असा आग्रह मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तीन भाषांमध्ये पोस्टर लावण्यात आले असून, भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीवजा मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे.