आज बारामतीत कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीची आढावा बैठक पडली पार

14

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. 

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, रेमडीसीवर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा. बारामती तालुक्यातील सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी असे आवाहन ही त्यांनी या वेळी केले.

तसेच तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.