मुंबईलगत असलेल्या मीरा रोडमध्ये कमिश्नर ऑफिसच्यामागे अंधार असताना घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकावेळी १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शांती नगरमध्ये रस्त्यावर मोकळ्या जागेवर घरगुती सिलेंडरच्या टाक्या असलेला टेम्पो पार्क करण्यात आला होता. याच टेम्पोतील एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये एकामागोमाग १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे एकामागून एक १२ सिलेंडर स्फोट झाल्याने मीरा रोड हादरले आहे. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या २ टँकर आणि ५४ जवान घटनास्थळी दाखल होते. मीरा रोडच्या शांती नगर येथील मोकळ्या मैदानात ही घटना घडली आहे. यामध्ये सिलेंडरच्या २ गाड्या जळाल्या आहेत. रविवारी मध्यरात्री २ वाजता आग लागली असून पहाटे ३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.
मीरा रोडमध्ये गडद अंधार असताना १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सेंट पॉल शाळेच्या बाजूला, सुरबी जीम समोर, राम नगर, मिरा रोड(पू.) येथे मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या एक टेम्पो १)MH ४३ Y ९१४१ व एक ट्रक २) MH ०४ FT १२६३ मधील घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. तसेच बाजूला पार्क केलेल्या MH ०४ GR ०८९३ या पिकअप वाहनाला देखील आग लागली होती.
एकामागोमाग एक असा सिलेंडरचा स्फोट होत होता. आगीचे लोळ उंच उंच उडत होते. स्फोट झाल्याने १ नागरिक जखमी झाला आहे. परंतु कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते आहे. स्फोट झाल्याच्या ठिकाणी नेहमी सिलेंडरच्या गाड्या उभ्या असायच्या तसेच इतर वाहनही पार्क केली जात होती. अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.