केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांच्यावर राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. ‘रावसाहेब दानवे हे दानव असून मला निवडणुकीत त्यांनी त्रास दिला. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत डोक्यावरील टोपी काढणार नाही’, असा संकल्प शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारतीचा भूमिपुजन समारंभ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती आवारात आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
‘रावसाहेब दानवे यांचा पराभव जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत टोपी काढणार नाही, असा संकल्प केला होता. पण, काही दिवसांनी परिस्थिती उलटली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवे निवडून आले पाहिजे, असं सांगितलं आणि टोपीचा मुक्काम आणखी वाढला. मी काही टोप्या घालण्याचे काम करत नाही, त्यामुळे टोपीचा मुक्काम पाच वर्ष वाढला आहे’, असं सांगताच सभागृहात मोठी हशा पिकली.
‘आता ज्यांच्या विरोधात टोपी घातली. त्यांच्या प्रचाराच काम करावे लागले. त्यावेळी दिल्लीतील मोठ्या नेत्याने आम्हाला बोलावून घेतले होते आणि त्यांनी दानवे यांच्या प्रचाराबद्दल सांगितले. पण, मी त्यांना सांगितले, हा माणूस जो आहे तो चकवा आहे, तो काय आमच्या मागे लागला तर पाठलाग सोडणार नाही. आज यांना निवडून दिले तर उद्या ते आमच्यामागे कोयता घेऊन लागतील, ते दानवे नाहीत दानव आहे. मी त्यांना माझ्या मतदारसंघात 1 लाखांची लीड दिली. पण, शेवटी जे करायचे तेच दानवेंनी केलं. अर्जुन खोतकर यांच्या मागे लागून बळी घेतला, अस सत्तार यांनी सांगितला.