राज्यात मनसे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी शिवसेनेला वीरप्पन गॅंग असे संबोधले आहे. तर त्यावर प्रतिक्रिया देतांना पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेवर बोचरी टीका केली आहे. मनसेला त्यांनी ‘टाईमपास टोळी’ असे संबोधले आहे.
मनसेच्या नेत्यांकडून शिवसेनेवर सातत्याने टीका करण्यात येते. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक आणि राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे संदिप देशपांडे यात अग्रेसर असतात. फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी वसूक करते असा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. फेरीवाल्यांना देण्यात येणार्या पावतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर लिहिण्यात आल्याचं देशपांडे यांनी यादरम्यान आज निदर्शनास आणलं.
यावर प्रतिक्रिया देतांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका केली आहे. ‘मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘टाइमपास टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल. ह्यांच्याकडं स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यांमुळे राजकीय वातावरणात चर्चा रंगत आहे. आता मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.