आमच्यापेक्षा मोदीजींना सल्ला द्या – जयंत पाटील

9

दिवसागणिक होणारी इंधनवाढ यावरुन आता सामान्यांचा खिसा रिकामा करण्यास कारणीभूत ठरते आहे. यावरुनच शिवसेनेने केंद्र सरकारविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावर टीका करतांना देवेंद्र फडणवीस यांनी ईंधन दरवाढीवरुन राज्य सरकारला सल्ले दिले होते. या पार्श्वभूमिवरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना ऊत्तर दिले आहे. आम्हाला सल्ले देण्यापेक्षा मोदीजींना सल्ला द्यावा असे जयंत पाटील म्हणाले. संघटना बळकट करण्यासाठी जयंत पाटलांचा राष्ट्रवादी-परिसंवाद कार्यक्रम राज्यभर सुरु आहे. यादरम्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात ते बोलत होते.

ईंधन दरवाढीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्यात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर टीका केली होती. “हे आंदोलन वगैरे करत बसू नका, हे सगळं नौटंकी आहे, करायचेच असेन तर ईंधनावरील कर कमी करा आणि सामान्यांच्या खर्चात कपात करा.” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला होता. यावर प्रतिक्रिया देतांना जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. “आम्हाला सल्ला देण्यापेक्षा, मोदीजींना म्हणावे असे वागणे बरे नव्हे. असे खोचक विधान जयंत पाटील यांनी केले. अद्यापपर्यंत केंद्र सरकारने राज्याचा जीएसटीचा परतावा दिलेला नाही याची आठवणसुद्धा पाटलांनी यावेळी करुन दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरसुद्धा जयंत पाटील यांनी यावेळी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हुकूमशाहीचा रोग लागला आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचेही ते म्हणाले. पेट्रोलचे दर शंभरीच्या आसपास पोहोचले आहेत, असे सांगताना त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. आपल्या देशाच्या अर्थमंत्री प्रचंड विद्वान आहेत, असे ते म्हणाले. पेट्रोलवर कर लावा आणि महसूल जमवा हेच केंद्र सरकारचे धोरण झाले आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा’ आयोजित केला आहे. आपल्या या संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात विदर्भातून केली आहे. पाटील यांनी आतापर्यंत एकूण आठ जिल्हयामध्ये तालुका आणि विधानसभा मतदारसंघात जात कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा हा दौरा असणार आहे. या दौर्‍याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.