अँजिओप्लास्टी नंतर संजय राऊत यांना मिळाला रुग्णालयातुन डिस्चार्ज

15

शिवसेना नेते संजय राऊत यांना छातीत दुखत असल्याने २ डिसेंबर रोजी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. संजय राऊत यांच्यावर यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यानंतर शनिवारी लीलावती रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर पुढील दोन दिवस संजय राऊत घरीच आराम करणार आहेत.

रुग्णालयाबाहेर आल्यावर त्यांनी डॉक्टरांचे, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, ‘माझी तब्येत अत्यंत ठीक आहे, चार दिवस उपचार केले. थोडा हृदयाचा त्रास होता. सगळ्यांच्या आशीर्वादाने, लिलावतीचे डॉक्टर, नर्सेस यांच्यामुळे मी आता बरा आहे. दोन दिवस विश्रांती घेऊन कामाला लागेन.

गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार दोन स्टेन हृदयात टाकण्यात आले आहेत. प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या नेतृत्त्वाखाली संजय राऊत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.