पराभवानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पराभूत झालो तरी संपलो नाही !

5


मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा दणदणीत पराभव केला होता. या विजयानंतर भाजपाने आघाडीच्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.


काल झालेल्या मतमोजणीत निसटत्या मताने पराभव झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात केली असून जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त १५ हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सर्व शक्ती एकत्र येऊन आपल्या विरोधात लढल्या असल्या तरी मतदारसंघातील जनतेने गेल्यावेळी पेक्षा 15 हजार मतांची वाढ झाली आहे.


आपले वडील देखील २००४ साली पहिल्यांदा पराभूत झाले होते, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर ३ वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिली असून पुढच्या वेळी या पराभवाचे उट्टे काढेन असे भगीरथ भालके यांनी सांगितले. विजयी झाल्यावर वडिलांप्रमाणे शड्डू ठोकण्याचा प्रयत्न विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाजूला राहून शड्डू ठोकण्यापेक्षा २०२४ च्या निवडणुकीत समोर या मग शड्डू कोण ठोकतोय ते दाखवून देईन असा टोला भगीरथ यांनी लगावला.