होळी आणि पोर्णिमेनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये होणार फेरबदल

68

पूजा चव्हाण ,सचिन वाझे अटक प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यामुळे तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होळी आणि पौर्णिमेनंतर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचे खाते हे बदलले जाणार आहे.वर्षा बंगल्यावर जाऊन शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा प्रस्ताव मांडला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास एकमत व्यक्त केले. ‘मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लवकरच तुम्हाला याबद्दल कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली.

सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे.

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

तसंच काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्तं करण्यात येत आहे. या संदर्भात काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.