बूँद से गई वो हौद से नहीं आती – अजित पवार

58

मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती करुन आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न..

मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती केली परंतु आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? असा सवाल जनतेच्या मनात आहे. आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरातीत नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे. त्यात वरील भागात भाजप-शिवसेनेचा उल्लेख केला तर मग भाजपचे मंत्री का नाहीत? असा सवाल करतानाच ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे त्यातील पाच मंत्र्यांच्या विरोधात काही ना काही बातम्या माध्यमातून सुरू आहेत. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न या नऊ लोकांचे फोटो छापून केला आहे का? याचे उत्तरही सरकारने दिले पाहिजे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

मंगळवार प्रमाणे आजही वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात देण्यात आली आहे. आज त्या जाहिरातीत शिवसेना आणि भाजप या दोघांचीही चिन्हं टाकण्यात आली आहेत. शिवाय गृहमंत्री अमित शाह, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो टाकण्यात आले आहेत. आता ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे वाक्य वापरण्यात आले आहे. पण ‘बुंद से गई वो हौद से नही आती’ असा टोला अजितदादांनी शिंदे – फडणवीस सरकारला लगावला.

कालच्या जाहिरातीवर शिंदे गटाच्या जबाबदार मंत्र्यांनी ती हितचिंतकांनी जाहिरात दिली असे स्पष्टीकरण दिले. परंतु तो कोण हितचिंतक आहे, पहिल्या पानावर एवढी महत्त्वाची जाहिरात दिली जाते तेव्हा त्याचा खर्च किती येतो हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे असा कोण हितचिंतक तुम्हाला मिळाला आहे, त्याचे नाव जाहीर करावे. सरकारने जाहिरातीचे समर्थन केले नसले तरी हितचिंतक कोण आहे, कशापद्धतीने त्याच्याकडे पैसा आला आहे हे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

तुमच्या सरकारबद्दल एवढा आत्मविश्वास असेल किंवा जनतेचे पाठबळ आहे असे वाटत असेल तर ज्या माध्यमातून आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत आहात तर निवडणुकीला सामोरे जा असे थेट आव्हानही अजितदादांनी सरकारला दिले.

महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही सरकारने अशा जाहिराती केल्या नव्हत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जाहिरातींचे पैसे कुणी दिले याची माहिती जनतेला कळायला हवी. सरकार देते तेव्हा जनतेचा पैसा येतो. शासनाच्या तिजोरीतून येतो तेव्हा जाहिरातींवर खर्च केला जातो. एवढ्या मोठ्या जाहिरातीचा खर्च केल्यानंतर आज लगेच त्यामध्ये आमुलाग्र बदल घडून सारवासारवी करण्याचा प्रयत्न झाला. ज्यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे नऊ सहकारी मंत्री झाले त्याच पक्षाला हा खोडसाळपणा वाटतोय किंवा कालचा खोडसाळपणा दूर करण्यासाठी आजची जाहिरात आहे का? या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

ठाणे जिल्हयात व शहरात असं काय घडलंय की १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली?

ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे, असा संतप्त सवालही अजितदादांनी यावेळी केला.

शेखर बागडेच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीमार्फत चौकशी करावी…

ठाणे जिल्हयात वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे याने बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्याची एसीबीमार्फत चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहे असे सांगतानाच शेखर बागडे याच्या मालमत्तेची आकडेवारीच त्यांनी माध्यमांसमोर ठेवली